Pune News : निष्क्रिय बँक खाते डेटा चोरी प्रकरण
एका बँक खात्यात 100 कोटी रुपये पडून
एमपीसी न्यूज : बँकेतील निष्क्रिय बँक खात्यांची माहिती हॅक करण्याचा प्रयत्न करून अब्जावधी रुपये लाटण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दहा व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही केली आहे. याप्रकरणी आता आणखी नवीन माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या गोपनीय माहिती मधून पाच महत्त्वपूर्ण बँक खात्याची माहिती प्राप्त झाली आहे. यातील एका खात्यात तब्बल शंभर कोटी रुपये पडून असल्याचे समोर आले आहे. तर अन्य चार खाते वेगवेगळ्या कंपनीशी संबंधित आहे.
रविंद्र महादेव माशाळकर (वय 34), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय 34) मूकेश हरिश्चंद्र मोरे (वय 37),राजशेखर यदैहा ममीडा (वय 34), रोहन रवींद्र मंकणी (37), विशाल धनंजय बेंद्रे (वय 45), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय 54), राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42), परमजित सिंग संधू (42) आणि अनघा अनील मोडक (वय 40) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी रोहन रवींद्र मंकणी हा भाजपशी संबंधित आहे. या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य सूत्रधार अनघा मोडक, राजेश शर्मा आणि परमजीत संधू या तिघांना न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात आरोपी अनघा मोडक हीच गुन्ह्यातील सर्व आरोपींना एकत्र बोलावले असल्याचे निष्पन्न झाले आहे. अनघा मोडक ही डेटा मिळवणे आणि तो डेटा संबंधित व्यक्तीपर्यंत पोचवणे असे काम करत असल्यामुळे तिला सर्वांची माहिती आहे. तसेच आरोपी राजेश शर्मा आणि परमजीतसिंग संधू यांना डेटा विकत घेण्यासाठी खुप पैसे मिळाले होते आणि ते पुढे कुणाला हा डेटा देणार होते, निष्क्रिय खात्यांचा तपशील आरोपींना कोणी आणि कधी दिलाय त्याचा शोध पोलीस करत आहे.
या गुन्ह्यात इतर राज्यातीलही काही आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हैदराबाद वापी लातूर या ठिकाणीही काही आरोपीच्या घरावर छापे टाकले आहे.