Pune News : किडनी प्रकरण : पोलिसांनी अटक केलेल्या एजंटांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिली

एमपीसी न्यूज : पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा एक प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु त्यातील पैसे न मिळाल्याने या महिलेने पोलिसात धाव घेतली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन एजंटना अटक केली आहे. या एजंट कडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
त्यांनी सहा वर्षांपूर्वी बदलापूर येथील एका डॉक्टरांच्या वडिलांना आणि पंढरपूर येथील एकास किडनी मिळवून दिली आहे.आरोपींनी मिळवून दिलेल्या किडन्यांचे ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणि कोइमतूर येथील केएचसीएच हॉस्पिटलमध्ये प्रत्योरापण झाले आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.
अभिजित शशिकांत गटणे (वय ४०, रा. रजूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय ४३, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही एजंट आहेत. त्यांनी देखील त्यांची किडनी दिल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.