Pune News : चिमुरडीवर बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा

एमपीसी न्यूज : अडीच वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर खून करणाऱ्या नराधमाला जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही घटना फेब्रुवारी 2019 रोजी पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यात घडली होती. संजय बबन काटकर (वय 28) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील कुरण खुर्द गावात घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. वेल्हा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान तपास सुरू असताना हवेली तालुक्यातील एका पुलाखाली या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला होत. शवविच्छेदन अहवालात या चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात केली होती.

तपासा दरम्यान हा गुन्हा संजय काटकर यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. तो रायगड जिल्ह्यातील एका वीटभट्टीवर लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात अपहरण बलात्कार, पॉक्स, खून आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान याच गुन्ह्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षभरात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये सतरा साक्षीदार तपासण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.