Chakan News : हॉटेल मधील कुक आणि मॅनेजरला मारहाण केल्याच्या रागातून तरुणाचा खून, एकावर खुनी हल्ला 

हॉटेल मालकासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज – हॉटेल मध्ये काम करणारा कुक आणि मॅनेजरला एका तरुणाने मारहाण केली. त्या कारणावरून हॉटेल मालक आणि त्याच्या साथीदाराने तरुणाचा खून केला. तर एकावर खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 9) रात्री अकरा वाजता पुणे नाशिक रोडवर वाकी गावच्या हद्दीत भाम नदीच्या ब्रिजजवळ घडली.

हेमंत संतोष सुतार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरज विठ्ठल वाळुंज (वय 28, रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) या तरुणावर खुनी हल्ला झाला आहे. वाळुंज यांनी याबाबत मंगळवारी (दि. 10) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हॉटेल मालक ऋतिक अतुल वहिले (वय 22), मयूर बाळासाहेब येवले (वय 20, दोघे रा. सुंबरेनगर, वाकी खुर्द, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज आणि त्यांचा मित्र हेमंत दोघेजण आरोपीच्या हॉटेलमध्ये गेले होते. तिथे त्यांचे हॉटेलच्या कुक आणि मॅनेजर सोबत भांडण झाले. हेमंत याने हॉटेलच्या कुक आणि मॅनेजरला मारहाण केली. याचा राग आरोपी हॉटेल मालक ऋतिक याच्या मनात होता.

सोमवारी रात्री अकरा वाजता फिर्यादी सुरज आणि त्यांचा मित्र हेमंत दोघेजण पुणे-नाशिक रोडने दुचाकीवरून जात होते. फिर्यादी दुचाकी चालवत होते. ते वाकी खुर्द गावच्या हद्दीत भाम नदीच्या ब्रिजजवळ आले असता आरोपी ऋतिक याने त्याच्या कारने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. फिर्यादी यांच्या पायावरून आरोपींनी कारचे चाक घालून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला.

दरम्यान, मयत हेमंत दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर आरोपींनी तलवार आणि लाकडी दांडक्याने मारून हेमंतचा निर्घृणपणे खून केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.