Chakan News : शेलपिंपळगाव येथील पैलवानाचा गोळ्या झाडून खून प्रकरणात एकास अटक

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलपिंपळगाव येथे पाच जणांनी मिळून एका पैलवानावर पाच ते सहा गोळ्या झाडत त्याचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

नागेश उर्फ तात्या सुभाष कराळे ( वय 37, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवकांत शिवराम गायकवाड (वय 43, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह योगेश बाजीराव दौंडकर आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गिरीश बाळासाहेब कराळे (वय 29, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नागेश कराळे शेलपिंपळगाव येथील एका बिअरशॉपी जवळ त्यांच्या जीपमध्ये बसत होते. ते जीपमध्ये बसले असता एका कार मधून आरोपी आले. त्यांनी कराळे यांच्यावर पिस्तूलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यात कराळे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कराळे यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी कारमधून निघून गेले. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लगेच परिसरातील रस्त्यांवर नाकाबंदी लावली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

नागेश कराळे हे पुणे जिल्ह्यातील एका नेत्याच्या जवळचे नातेवाईक आहेत. ते तालीम चालवत असल्याने त्यांची परिसरात पैलवान अशी ओळख आहे. त्यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे म्हटले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.