Pimpri news: ‘या’ दरानुसारच अम्ब्युलन्स साठी मोजा पैसे

एमपीसी न्यूज – रुग्णवाहिकांनी रुग्णांना ने-आण करण्यासाठी किती दर आकारावेत, याचे प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) दरपत्रक जाहीर केले आहे. तसेच हे दरपत्रक संबंधित रुग्णवाहिकेच्या आतील बाजूला नागरिकांना दिसेल अशा दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे.

या दरपत्रकापेक्षा जास्त भाडे आकारल्यास  [email protected] या ईमेल आयडीवर तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. अशा तक्रारींची नोंद घेऊन संबंधित रुग्णवाहिकेवर आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील खासगी रुग्णवाहिका रुग्णांना तासाला 1 हजार ते 3 हजार रुपये दर आकारत आहेत. कोरोनामुळे मृत्यूमुखी पावलेले मृतदेहाचे दहन करण्यासाठी चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागते. त्यानुसार मृताचे कुटुंबीय रुग्णवाहिकेला तासाला 1 हजार रुपये याप्रमाणे 4 ते 5 हजार रुपये, तर 3 हजार रुपये याप्रमाणे 12 ते 15 हजार रुपये मोजत आहेत.

जनतेची लूट होत असल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सर्व खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन या कार्यालयामार्फत संचलन करण्याची मागणी केली होती.

पुणे प्रादेशिक व पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गुरूवारी (दि. 22) एक आदेश जारी करून कोरोना रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी दरपत्रक निश्चित केले आहे. ज्या रुग्णवाहिका मालक-चालक ठरवून दिलेल्या भाडेदरापेक्षा जास्त दर आकारणी करतील अशा वाहनधारकाची तक्रार वाहन क्रमांकासह [email protected] या ईमेल आयडीवर करावी. अशा तक्रारीची नोंद घेऊन त्यांच्यावर आरटीओच्या वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आरटीओने जारी केलेल्या दरपत्रकानुसार रुग्णवाहिका असलेल्या मारूती गाडीसाठी दर 25 किलोमीटरला किंवा 2 तासासाठी 500 रुपये, प्रतिकिलोमीटरसाठी 11 रुपये आणि प्रतिक्षेसाठी दर तासाला 100 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तसेच टाटा सुमो, मेटोडोर रुग्णवाहिकेसाठी दर 25 किलोमीटरसाठी किंवा 2 तासासाठी 600 रुपये, प्रति किलोमीटरसाठी 12 रुपये आणि प्रतिक्षेसाठी दर तासाला 125 रुपये, त्याचप्रमाणे टाटा 407, स्वराज माझदा इत्यादी चॅसिसवर बांधणी केलेल्या रुग्णवाहिकेसाठी दर 25 किलोमीटरला किंवा 2 तासासाठी 900 रुपये, प्रति किलोमीटरसाठी 13 रुपये आणि प्रतिक्षेसाठी दर तासाला 150  रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

सर्व रुग्णवाहिका चालक मालक संघटना, रुग्णालयांनी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णसेवा करावी व कोणत्याही रुग्णाकडून अतिरिक्त भाडे आकारणी करण्यात येऊ नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे.

रुग्णवाहिका चालक-मालक यांच्यासाठी अटी आणि शर्ती

# निश्चित केलेले भाडेदर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी लागू आहेत.

_MPC_DIR_MPU_II

# भाडेदर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी आहेत. 25 किलोमीटरच्या पुढे अंतर गेल्यास प्रति तास प्रमाणे भाडे वाढ होईल. प्रतिक्षादर लागू राहतील.

# हे दरपत्रक रुग्णवाहिकेत आतील बाजूस प्रदर्शित करण्यात यावे.

# वाहन प्रवास न करता उभे असल्यास प्रत्येक तासाकरीता प्रतिक्षा दर लागू राहतील.

# प्रस्तावीत केलेल्या कमाल भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारात येणार नाही.

# रुग्णवाहिकेला जीपीएस प्रणाली असणे आवश्यक आहे.

# प्रत्येक फेरीनंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

# मोटार वाहन कायदा व त्यातील तरतुदीनुसार वेळोवेळी लागू होणारे नियम व अटी लागू राहतील.

# सर्व रुग्णवाहिका वातानुकूलित असल्याचे ग्राह्य आहे. तसेच आवश्यकतेनुसार किंवा रुग्णाच्या विनंतीनुसार वातानुकूलित यंत्रणा चालू अथवा बंद ठेवता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.