Hinjawadi News : चायनीज हातगाडीवाल्यांकडून आठ महिन्यांपासून घ्यायचा खंडणी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – चायनीज हातगाडी चालकाकडून आठ महिन्यांपासून एक व्यक्ती दररोज 300 रुपये खंडणी घेत होता. खंडणी घेऊनही त्याने हातगाडी बंद करण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार मागील आठ महिन्यांपासून 16 मे 2022 पर्यंत हिंजवडी फेज एक येथे आदित्य चायनीज सेंटर या हातगाडीवर घडला.

अतुल उर्फ काळू साखरे (रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या  आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभय सतीश गायकवाड (वय 23, रा. सोमाटणे गाव, ता. मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची हिंजवडी फेज एक येथे आदित्य चायनीज सेंटर नावाची हातगाडी आहे. मागील आठ महिन्यांपासून आरोपीने फिर्यादी यांच्या हातगाडीवर येऊन फिर्यादीला व्यवसाय करू देण्यासाठी म्हणून दररोज 300 रुपये खंडणी घेतली. सोमवारी (दि. 16) सायंकाळी सहा वाजता आरोपी बुलेटवरून आला. त्याने फिर्यादी यांना चायनीजची हातगाडी बंद करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने 300 रुपयांची मागणी केली. तसेच आरोपीने फिर्यादी यांच्या हातगाडीजवळ लागणाऱ्या सर्व हातगाड्यांवरून दररोज खंडणी घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.