Chakan News : भर दिवसा भंगार व्यावसायिकाचे अपहरण करून घेतली खंडणी

एमपीसी न्यूज – कंपनीत भंगार आहे, त्यासाठी तू चल असे म्हणून भंगार व्यावसायिकाचे अपहरण केले. त्यानंतर व्यावसायिकाला निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करून त्यांच्याकडे दोन लाखांची खंडणी मागितली. व्यावसायिकाने पत्नी आणि मित्राच्या मदतीने आरोपींना 40 हजारांची खंडणी दिली. त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाला मारहाण करून धमकी देत सोडून दिले. हा प्रकार 15 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते पाच या कालावधीत भांबोली गाव परिसरात घडला.

याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने गुरुवारी (दि. 21) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भंगारचे दुकान आहे. आरोपी 15 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता फिर्यादी यांच्या भंगारच्या दुकानावर आले. ‘कंपनीमध्ये भंगार आहे. तू आमच्या बरोबर चल’ असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना दुकानापासून काही अंतरावर डोंगरावर निर्जन ठिकाणी नेले. तिथे आरोपींचे काही साथीदार थांबले होते.

एकाने फिर्यादी यांच्या पोटावर चाकू लावून धमकावले. तसेच आरोपींनी झाडाच्या फांदीने फिर्यादी यांना मारहाण करत दोन लाखांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी त्यांच्या मित्राकडून 23 हजार रुपये आणि पत्नीकडून 17 हजार रुपये मागवले. एकूण 40 हजार रुपये आरोपींनी घेतले आणि आणखी 60 हजारांची मागणी केली. तसेच धमकी देत फिर्यादी यांना पाच वाजता सोडून देऊन आरोपी निघून गेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.