Pune Crime News : ‘गावातल्या अब्यामुळे आत्महत्या करतेय’, चिठ्ठी लिहून नववीतल्या मुलीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गावातल्या टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. इंदापूर तालुक्यातील बोरी गावात बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पुणे ग्रामीण पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धी गजानन भिटे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. गणेश संतोष कुचेकर आणि यश अरुण गरगडे या दोघांसह एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धी शाळेत जात असताना हे तिघेजण तिची छेड काढत असल्याचं आता समोर आला आहे. त्यामुळेच तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी सिद्दीने लिहिलेली एक चिठ्ठी घरात सापडली आहे. त्यात लिहिलंय मला माहित आहे माझं चुकतय, पण आई वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून आत्महत्या करत असून गावातल्या ‘आब्या’मुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.