Srh Vs Rcb Live : बंगलोरचे ‘रॉयल चॅलेंज’ हैदराबादवर पडले भारी

एमपीसी न्यूज – विवेक कुलकर्णी – बंगलोर संघाने हैदराबाद संघाचा (Srh Vs Rcb Live) सन राईज होऊ दिला नाहीच. तर, 67 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत आपले विजयी अभियान चालू ठेवले. 

टाटा आयपीएल 2022 च्या आजच्या 54 व्या सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला गेला. ज्यात बंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करत 192 धावांची विशाल धावसंख्या उभी केली आणि नंतर त्याचा बचाव करताना जबरदस्त कामगिरी करून हैदराबाद संघाला फक्त 125 धावात गारद करून 67 धावांच्या मोठया फरकाने सामना जिंकून आपला प्लेऑफचा दावाही मजबूत केला आहे. गोलंदाजीत हसरंगा, हेजलवूड तर फलंदाजीत डूप्लेसी, पाटीदार आणि कार्तिकने प्रभावी कामगिरी करत विजयात मोठा वाटा उचलला.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (Srh Vs Rcb Live) कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोहली आणि डूप्लेसीने डावाची सुरुवात केली, पण विराट कोहली डावाच्या पहिल्याच चेंडूवर सूचितच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पण, त्यानंतर आलेल्या रजत पाटीदारने डूप्लेसीला जबरदस्त साथ दिली आणि डाव चांगलाच सावरला. या दोघांनीही चांगल्या बॉलला योग्य तो सन्मान दिला, तर खराब चेंडूचा योग्य तो समाचार घेत बघता बघता डावाला चांगलाच आकार देत दुसऱ्या गड्यासाठी 105 धावांची भागीदारी करून एका मोठ्या धावसंख्येची आस दाखवली. मात्र, वैयक्तिक अर्धशतकाजवळ आल्यावर पाटीदार आपली विकेट सूचितला देऊन बसला. त्याने 48 धावा काढल्या.

तो बाद झाल्यानंतर (Srh Vs Rcb Live) आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आपल्या आक्रमक शैलीत 33 धावा काढताना कर्णधार डूप्लेसी सोबत तिसऱ्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. त्याला डावाच्या 19 व्या षटकात कार्तिक त्यागीने वैयक्तिक 33 धावांवर बाद केले. या दरम्यान डूप्लेसीने आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे 25 वे अर्धशतक होते. त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने स्फोटक फलंदाजी करत फक्त 8 चेंडूत चार षटकार आणि एक चौकार मारत घणाघाती नाबाद 30 धावा केल्या. ज्यामुळे आरसीबी संघाने डावाच्या अखेरच्या 10 चेंडूत 43 धावा करुन आपल्या निर्धारित 20 षटकात 3 बाद 192 अशी मोठी धावसंख्या रचली. डूप्लेसीने 50 चेंडूत 8 चौकार आणि दोन षटकार मारत नाबाद 73 धावा केल्या.

Srh Vs Rcb Live rcb loss

हैदराबाद संघाकडून जगदीश सुचितने दोन तर कार्तिक त्यागीने एक बळी बाद केला. या स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघाचा प्रवास खराब, मग चांगला आणि मग पुन्हा खराब असा झाला आहे. मात्र, ‘अंत भला तो सब भला’ या उक्तीनुसार आपले ध्येय गाठण्यासाठी आणि आपली गाडी विजयी रुळावर आणण्यासाठी आज हैदराबाद संघाला 120 चेंडूत 193 धावांचे विशाल लक्ष्य साध्य करायचे होते. त्यासाठी हवी होती एक ठोस, आणि आश्वासक सुरुवात. मात्र ती करण्यात अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विल्यमसन सपशेल फेल ठरले. डावाच्या पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला मॅक्सवेलने त्रिफळाबाद करून हैदराबाद संघाला मोठा धक्का दिला, तर त्यातून सावरण्याआधीच केन विल्यमसनला शाहबाजने धावचित करुन दुसरा मोठा धक्का दिला. दोघेही भोपळा न फोडताच तंबूत परतले आणि हैदराबाद संघाला या सामन्यातही मात खावी लागेल, असेच चिन्हे दिसू लागले.

या संकटातून हैदराबाद संघाला (Srh Vs Rcb Live) एडिन मार्करम आणि राहूल त्रिपाठीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अर्धशतकी भागीदारी करून त्यात यशही मिळवले, मात्र बरोबर अर्धशतकी भागीदारी झाली आणि या जोडीला नजर लागली. मार्करमची छोटी खेळी हसरंगाने संपवली. यावेळी हैदराबादची अवस्था 9व्या षटकात 3 बाद 51 अशी होती. यानंतर यातले निकोलस पुरनने राहुल त्रिपाठीला थोडी फार साथ दिली. पण, ही साथ फक्त 38 धावांचीच ठरली. पुरनला आपल्या फॉर्मला आज तरी जागता आले नाही. आज तो फक्त 19 च धावा करू शकला. त्यालाही हसरंगाने बाद केले.

IPL 2022 : राजस्थानने पंजाबवर सहा गडी राखून मिळवला दणदणीत विजय

 

Srh Vs Rcb Live srh win

यानंतर, मात्र हैदराबाद संघाचा सन राईज होण्याऐवजी मावळतीलाच झुकू लागला. त्यांच्यासाठी त्यातल्या त्यात एकच बाब आशादायक होती. ती म्हणजे राहुल त्रिपाठी अजूनही लढत होता. त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले होते. मात्र, तोही हेजलवूडचा शिकार झाला आणि त्यानंतर हैदराबाद संघाची एकदम घसरगुंडी उडाली. त्रिपाठीने 58 धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा हैदराबादची धावसंख्या 6 बाद 114 होती. यानंतर त्यांच्या फक्त 11 धावात चार गडी बाद झाले आणि त्यांचा संघ 125 धावात गारद झाला. हैदराबाद संघाच्या फलंदाजांना बाद होण्याची इतकी घाई झाली होती, की त्यांचे 15 व्या आणि 19 व्या षटकात लागोपाठ दोन दोन गडी बाद झाले होते. या संधीचे सोने करून घेतले ते हसरंगाने त्याने आपल्या 4 षटकात 1 षटक निर्धाव टाकत तब्बल 5 गडी बाद केले. त्याला हेजलवूडने दोन गडी बाद करुन उत्तम साथ दिली. हैदराबादचा हा 5 वा पराभव आहे, तर आरसीबीसाठी या विजयाने प्ले ऑफची आशा आणखी बळकट केली आहे.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

3 बाद  192

डुप्लेसी नाबाद 73,मॅक्सवेल 33,रजत पाटीदार 48,दिनेश कार्तिक नाबाद 30

सूचिथ 30/2,त्यागी 42/1

विजयी विरुद्ध

सनरायजर्स हैदराबाद

19.2 षटकात सर्वबाद 125

राहुल त्रिपाठी 58,मार्करम 21,पुरन 19,भुवी 8

हसरंगा 18/5,हेजलवूड 17/2,मॅक्सवेल 13/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.