Chakan News : एसटी बस उलटली; चालक, वाहकासह दहाजण जखमी एक महिला अत्यवस्थ  

कुरुळी फाटा येथील घटना

एमपीसी न्यूज : चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुणे – नाशिक महामार्गावर चाकण जवळील कुरुळी फाटा येथे मंगळवारी ( दि. २४ ऑगस्ट ) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान एसटी बस उलटली. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली असून, कोणतीच जीवितहानी झाली नाही.

या अपघातात चालक, वाहकासह बसमधील चार महिला व चार पुरुष असे एकूण दहाजण जखमी झाले आहेत. यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून, जखमींवर चाकण येथे उपचार सुरु आहेत.   ब्रेक निकामी व स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

महाळुंगे इंगळे पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जखमींना तातडीने चाकण परिसरातील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले. जखमींची नावे मात्र सायंकाळी उशिरापर्यंत समजली नसून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अधिक वृत्त असे की, पुणे – नाशिक महामार्गावरून कोपरगाव ते पुणे अशी आठ प्रवाशी घेवून एसटी बस ( क्र. एम.एच.४० क्यू. ६०२७ )भरधाव जात होती.

एसटी बस चाकण जवळील कुरुळी फाटा हद्दीत आली असता ब्रेक निकामी व स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस भर रस्त्यात उलटली. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली असून, एसटीच्या चालक, वाहकासह चार महिला व चार पुरुष असे एकूण दहा जण जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी चाकण येथे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत एसटी बस खाली हात अडकून पडलेल्या एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एसटी उलटल्याने महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी काही वेळात वाहतूक पूर्ववत केली.

कुरुळी फाटा हा परिसर वर्दळीचा असल्याने येथे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. दुपारी महामार्गावर किरकोळ गर्दी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.  महाळुंगे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.