Pune News : ज्येष्ठ डॉक्टरांचा घरात सापडला मृतदेह, उपचारा दरम्यान बहिणीचाही मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील प्रभात रस्त्यावरील एका घरात ज्येष्ठ डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. तर या घरात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या या डॉक्टरांच्या बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. डॉक्टर सुबिर सुधीर रॉय (वय 68) आणि जितकी सुधीर रॉय (वय 65) अशी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, डॉक्टर सुबिर रॉय हे नामवंत नेत्रतज्ञ आहेत. विश्रांतवाडी आणि येरवडा परिसरात यांचे क्लिनिक आहे. दरम्यान तीन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे त्यांच्या एका नातेवाईकाने शुक्रवारी ते रहात असलेल्या घरी जाऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

नातेवाईकांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना हॉलमध्ये जितीका या बेशुद्धावस्थेत आढळल्या. तर डॉक्टर सुबिर रॉय यांच्या बेडरूमचा दरवाजा बंद होता आणि त्यातून दुर्गंधी येत होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता स्वच्छतागृहात डॉक्टर रॉय हे मृतावस्थेत आढळले. त्यानंतर पोलिसांनी बेशुद्ध असलेल्या जितीका यांना रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तपासणीअंती डॉक्टर सुबिर यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

डॉक्टर सुबिर रॉय हे नामवंत नेत्रतज्ञ होते. डेक्कन परिसरातील भोंडे कॉलनीमध्ये ते बहीण आणि भावासह राहत होते. त्यांच्या भाऊ आणि बहिणीला मानसिक आजार होता. त्यामुळे त्यांची देखभाल देखील तेच करत होते. काही दिवसांपूर्वी पावसात भिजल्यामुळे ते आजारी पडले होते. आता नंतर तीन दिवसांपासून ते क्लिनिकला हि गेले नव्हते. दरम्यान यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे नातेवाइकांनी घरी येऊन पहाणी  केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.