Dapodi News : रस्त्यावर पडलेल्या मांजात अडकून दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा मांजा नागरिकांसाठी धोकादायक आहे. दापोडी येथे पतंगाचा कट झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मांजात अडकून एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून गळ्याला लहान जखम झाली. अन्यथा मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता होती. सोमवारी (दि. 4) सायंकाळी पावणे सहा वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर सीएमई गेट समोर दापोडी येथे ही घटना घडली.

आशिष सुरेश पवार (वय 32, रा. साळवेनगर, बोपोडी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार त्यांच्या दुचाकीवरून जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात होते. ते दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) गेट समोर दापोडी येथे आले असता पतंग उडवताना कट झालेला मांजा रस्त्यावर पडला होता. तो मांजा पवार यांच्या गळ्याला आणि बोटाला अडकला. त्यामुळे पवार यांच्या गळ्याला आणि बोटाला दुखापत झाली. पोलीस हवालदार बोडरे तपास करीत आहेत.

अज्ञात व्यक्तीने पतंग उडवताना कट झालेला मांजा गोळा न करता तो तसाच रस्त्यावर टाकला. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चालू वाहनावरून मांजा दिसायला कठीण आहे. तसेच दिसला तरी वाहनाचा वेग आवरणे देखील अवघड आहे. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. तर काही जणांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.