India Corona Update : देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या साडे चार लाखांच्या आत

एमपीसी न्यूज – देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असून, सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या साडे चार लाखांच्या आत आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात मागील 24 तासांत 44 हजार 739 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात 38 हजार 617 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 89 लाख 12 हजार 908 एवढी झाली आहे. त्यापैकी 83 लाख 35 हजार 110 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 4 लाख 46 हजार 805 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात आतापर्यंत 1 लाख 30 हजार 993 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या 24 तासांत 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.46 टक्के एवढा आहे तर, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.51 टक्के एवढे झाले आहे.

देशात आतापर्यंत 12 कोटी 74 लाख 80 हजार 186 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 37 हजार 279 नमूणे हे मंगळवारी (दि.17) तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात नव्यानं वाढणा-या रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर, दिल्ली आणि केरळ मध्ये अधिक रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 6 हजार 396 तर केरळमध्ये 5 हजार 752 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.