Chakan News : तरुणावर कोयत्याने वार, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – गल्लीत मोठमोठ्याने ओरडल्याचा आवाज येत असल्याने, काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून, लोखंडी रॉडने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 2) रात्री खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.

रोहित रघुनाथ घोडके (वय 19, रा. खराबवाडी, ता. खेड) असे खुनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन्या दौंडकर (रा. खराबवाडी, खेड), अक्षय जोगदंड (रा. राणूबाई मळा, चाकण), दरेकर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घोडके हे मजुरीचे काम करतात. मंगळवारी रात्री सात वाजताच्या सुमारास ते घरी असताना त्यांच्या गल्लीत मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याचा आवाज येत होता. त्यामुळे काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी घोडके आवाजाच्या दिशेने गेले. आरोपी सोन्या याने विनाकारण घोडके यांच्याकडे येऊन त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. घोडके यांनी हात आडवा घातल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

त्यानंतर सोन्या याने त्याच्या अनोळखी साथीदाराच्या हातातील लोखंडी रॉड घेऊन ‘तुला आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणत डोक्यात जोरात मारला. आरोपी अक्षय आणि दरेकर यांनी देखील घोडके यांना लोखंडी रॉडने मारले, तर अनोळखी आरोपीने लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले. या हल्ल्यात घोडके गंभीर जखमी झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.