Pune News : निलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाच्या अखेर मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज : सराईत गुन्हेगार निलेश घायवळ याच्या टोळीतील फरार असलेल्या एका गुंडाच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा गुंड मोक्काच्या गुन्ह्यात फरार होता. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु, युनिट तीनच्या पथकाला कर्वेपुतळा येथे तो आल्याचे समजताच त्याला पकडले. समीर बाळु खेंगरे (वय 24, रा. आशिष गार्डन चौक, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा कुविख्यात गुन्हेगार निलेश घायवळ टोळीचा सदस्य आहे. कोथरूड पोलीसांत खूनाचा प्रयत्नासह इतर कलमान्वये दाखल असणाऱ्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. मोक्का कारवाईनंतर समीर हा पसार झाला होता. त्याचा शोध घेतला जात होता. परंतु, तो मिळून येत नव्हता.

यादरम्यान, युनिट तीनच्या पोलीस निरीक्षक अनिता मोरे व त्यांचे पथक रोपींची माहिती काढत होते. यावेळी समीर हा कर्वेपुतळा परिसरात शीतल हॉटेल समोर येणार आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक तेजस्वी पवार व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी कोथरूड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.