Shirgaon News : शेतक-याची वडिलोपार्जित जमीन हडपण्याचा प्रयत्न

विचारपूस करण्यासाठी गेलेल्या शेतक-याला जातीवाचक शिवीगाळ

एमपीसी न्यूज – शेतक-याची वडिलोपार्जित जमीन चौघांनी मिळून शेतक-याची बनावट सही करून खरेदी पावती करत हडपण्याचा प्रयत्न केला. याबाबत शेतकरी विचारपूस करण्यासाठी गेला असता शेतक-याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. हा प्रकार 1 फेब्रुवारी रोजी शिरगाव येथे घडला.

उस्मान दगडू शेख (रा. शिरगाव, ता. मावळ), समीर शिरील मुनतोडे (रा. वडगाव शेरी, पुणे), अशोक लक्ष्मण कांबळे (रा. कांबरे, ता. मावळ), जहांगीर राजू डांगे (रा. शिरगाव, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लिंबाजी रामभाऊ गायकवाड (वय 56, रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील गट नंबर 197 यापैकी 50 आर ही फिर्यादी यांची वडिलोपार्जित जमीन आहे. त्या जमिनीबाबत विचारपूस करण्यासाठी फिर्यादी हे आरोपी उस्मान याच्या घरी गेले असता उस्मान याने फिर्यादी यांना ‘जमिनीबाबत काय विचारतो, ती जमीन माझी आहे’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.

‘माझा मुलगा पोलीस पाटील आहे. पोलिसात तक्रार दिली तर तुला या गावातून गायब करून जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. 2 फेब्रुवारी 2022 पूर्वी आरोपींनी सदर जमिनीचे बनावट खरेदी पावती करून त्यामध्ये फिर्यादी यांच्या नावाची बनावट सही केली. फिर्यादी यांची वडिलोपार्जित मिळकत हडपण्याचा, लुबाडण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. तसेच न्यायालयास फसवण्याच्या उद्देशाने खोटी खरेदी पावती तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.