Wakad Crime News : बारणे कॉर्नरवर दुचाकीवरील दोघांना चिरडून पळालेला बस चालक पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – खाजगी बस चालकाने बस हायगयीने, भरधाव वेगात चालवून एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघात केल्यानंतर पळून गेलेल्या बस चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली.

प्रकाश श्यामराव बुरंगे (वय 27, रा. वृंदावन कॉलनी, काळेवाडी पुणे) असे अटक केलेल्या बस चालकाचे नाव आहे. शुभम बबन गायकवाड (वय 20, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर नंदू ज्ञानेश्वर लोखंडे (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. लोखंडे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोखंडे आणि त्यांचा मित्र मयत शुभम गायकवाड हे दोघेजण मंगळवारी (दि. 28) रात्री पावणे अकरा वाजता त्यांच्या दुचाकीवरून बारणे कॉर्नर येथून जात होते. त्यावेळी आरोपी बस चालकाने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांचा मित्र शुभम गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यात शुभम गायकवाड याचा मृत्यू झाला आहे.

वाकड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना बसची ओळख पटली नाही. पोलिसांनी शोध घेत बसची ओळख पटवली. आरोपी प्रकाश बुरंगे बस घेऊन थेरगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून प्रकाश याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस कर्मचारी प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.