MP Dhananjay Mahadik : “भाऊ, तुमच्यामुळे मी परत खासदार झालो”; नवनिर्वाचित भाजप खासदार धनंजय महाडीक गहिवरले

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी जाऊन धनंजय महाडीक यांनी मानले आभार

एमपीसी न्यूज – “भाऊ, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो”, आमदार लक्ष्मण जगताप यांचे काल (दि. 11 जून) आभार व्यक्त करताना नवनिर्वाचित भाजप खासदार धनंजय महाडीक (MP Dhananjay Mahadik) यांना गहिवरून आले. खासदार महाडीक यांनी विजयानंतर शनिवारी रात्री पिंपळे गुरव येथील आमदार जगताप यांच्या निवास्थानी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 

नवनिर्वाचित भाजप खासदार धनंजय महाडीक (MP Dhananjay Mahadik) म्हणाले, “भाऊ, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती भाजपच नाही तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारी आहे”, असे म्हणून जगताप यांच्यामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय सुकर झाला अशा शब्दांत आभार व्यक्त केले.

“तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. पिंपरी-चिंचवडमधील जनतेच्या सेवेसाठी तुम्ही लवकरात लवकर पुन्हा नव्या जोमाने काम सुरू करा. आपल्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकवायचा आहे”, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

PM Modi Dehu Visit : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद; वाचा सविस्तर…

दरम्यान, खासदारपदी निवड झाल्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी धनंजय महाडीक यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू, माजी नगरसेवक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी जगताप कुटुंबियांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक यांचे औक्षण करून अभिनंदन केले.

मुंबईत विजयाचा जल्लोष केल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक शनिवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये आले. त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. आमदार जगताप व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांनी तब्येतीची विचारपूस केली.

दरम्यान, विधानसभेतील आमदारांमधून निवडून द्यावयाच्या 06 जागांसाठी शुक्रवारी (दि. 10) मतदान झाले. निवडणूक रिंगणात 7 उमेदवार उतरल्याने चुरस निर्माण झाली होती. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे चार आणि भाजपचे तीन उमेदवार रिंगणात होते. त्यातील शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडीक (MP Dhananjay Mahadik) यांच्यात सहाव्या जागेसाठी लढाई झाली. त्यात भाजपचे धनंजय महाडीक विजयी झाले. पक्षाने या विजयाचे संपूर्ण श्रेय चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना दिले आहे. आमदार जगताप हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. ते मरणाच्या दारातून परतले आहेत. त्यांना नुकतेच घरी सोडण्यात आले असून अजूनही त्यांना तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे.

मात्र आमदार जगताप यांनी पक्षाला एका-एका मताची असलेली गरज ओळखून पिंपरी-चिंचवड ते मुंबईपर्यंत अॅम्ब्युलन्समधून प्रवास करत निवडणुकीत मतदान केले. त्यांची ही पक्षनिष्ठा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील संपूर्ण भाजप भारावून गेली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानामुळे भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडीक (MP Dhananjay Mahadik) यांचा विजय सोपा झाला तसेच निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीतील हा विजय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि पुण्यातल्या भाजपच्या दुसऱ्या आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.