Pimpri News : भाजपचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक, कामगार नेते केशव घोळवे यांना अटक

पालिकेकडून गाळे मिळवून देतो असे सांगत भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी पावत्या करायला लावून व्यापा-यांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गाळे मिळवून देतो असे सांगून भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे  करायला भाग पाडून व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भाजपचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक, कामगार नेता केशव घोळवे यांना अटक करण्यात आली आहे.

 

मोहम्मद तय्यब अली शेख (वय 45, रा. पिंपरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनशाम यादव, मलका यादव, केशव घोळवे, हसरत अली शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि इतर व्यापारी नेपाळी मार्केट येथे कपड्याचा व्यापार करतात. त्यांची जागा मेट्रोच्या प्रकल्पात जाणार आहे. तिला पर्याय म्हणून शासनाकडून फिर्यादी आणि इतर व्यापा-यांना 100 गाळे कायदेशीर मिळणार आहेत. असे असताना आरोपींनी आपसात संगनमत करून सन 2019 ते आज पर्यंत फिर्यादी व इतर व्यापा-यांना महापालिकेकडून गेले मिळवून देतो असे आश्वासन दिले. त्यापोटी भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडले. त्यातून फिर्यादी आणि इतर व्यापा-यांची फसवणूक केली.

शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून 55 हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर देखील एक लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.