Pune News : नाना पेठेतील वाड्यात आंदेकर टोळीतील गुंड आणि पोलिसात थरार, फरार गुंड ‘अक्षय’ अखेर जेरबंद

एमपीसी न्यूज : कुख्यात आंदेकर टोळीचा खुनाच्या गुन्ह्यातील फरार गुंड अक्षय अकोलकर (वय 30) याला अखेर जेरबंद करण्यात आले. मला उसने दिलेले पैसे परत मागतो का? मी जेल मध्ये असताना माझ्या घरच्यांना त्रास देतो का? असे म्हणून त्याने एकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले होते.

या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पुणे पोलीस त्याच्या मागावर होते.

दरम्यान मंगळवारी तो नाना पेठ येथील एका वाड्यात खोली घेऊन एकटाच राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या वाड्याला चारी बाजूने घेरले आणि तो राहत असलेल्या खोलीत छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपले नाव अक्षय दशरथ अकोलकर (वय 30) असे सांगितले. तसेच केलेल्या गुणांची कबुलीही दिली.

अक्षय हा आंदेकर टोळीचा सक्रिय सदस्य आहे. त्याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी दुखापत, तडीपारी आदेशाचा भंग करणे अशा प्रकारचे 13 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आतापर्यंत तीन वेळेस मोक्का  कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.