Vaishali Khole : संस्कार टिकले तर देश टिकेल – ह.भ.प. वैशाली खोले

एमपीसी न्यूज –  “संस्कार करण्याची जबाबदारी जननीची असते. सुसंस्कार आयुष्यभर सोबत राहतात म्हणून संस्कार टिकले तर देश टिकेल,” असे मत ह.भ.प. वैशाली खोले (Vaishali Khole) यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘जननी ते जन्मभूमी’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना वैशाली खोले बोलत होत्या. माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर अध्यक्षस्थानी होते.

खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अप्पा देशमुख, किसनमहाराज चौधरी, विपुल नेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शकुंतला माटे यांना शैक्षणिक कार्यासाठी (जिजाऊ पुरस्कार), विनायक रबडे यांना घनपाठी वेदाध्ययनासाठी (चिंतामणी पुरस्कार) आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ अनिल पाटील यांना (क्रांतिवीर चापेकर पुरस्कार) प्रदान (Vaishali Khole) करून गौरविण्यात आले.

गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारांविषयी भूमिका मांडली; तसेच व्याख्यानमाला समन्वय समितीचे कार्य, जिजाऊ व्याख्यानमाला आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे विविध उपक्रम याविषयी माहिती दिली. पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना शकुंतला माटे यांनी, “लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यायला नको!” आणि अनिल पाटील यांनी, “वैचारिक क्रांतीच्या माध्यमातून भारतातील पाणीसमस्या सुटेल!” असे विचार मांडले.

भाऊसाहेब भोईर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “योग्य वयात योग्य भोंगे आसपास असायला पाहिजेत. संस्कारक्षम वयात अनेकांनी आम्हांला घडविल्यामुळे गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक अन् सांस्कृतिक कार्य करता आले!” अशा भावना व्यक्त केल्या. कै. मोरेश्वर भागुजी गोलांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेतील अंतिम पुष्प आयोजित करण्यात आले होते.

ह.भ.प. वैशाली खोले (Vaishali Khole) पुढे म्हणाल्या की, “गणपती आणि कार्तिकेय या बंधूंमध्ये पृथ्वीप्रदक्षिणा घालण्याची स्पर्धा ठरली. त्यावेळी गणपतीने आपली माता पार्वतीच्या भोवती प्रदक्षिणा घालून स्पर्धा जिंकली. या पौराणिक कथेतून प्राचीन काळापासून पंचमहाभूतांपेक्षाही माता सर्वश्रेष्ठ आहे, ही शिकवण मिळते. “मातृदेवो भव…” या वचनामध्ये मातेला अग्रस्थान देण्यात आले आहे. या भूतलावर परमेश्वर प्रत्यक्ष अवतरू शकत नाही म्हणून ते स्थान आईला देण्यात आले आहे. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयेसी’ म्हणजे जन्मभूमी ही स्वर्गाहून श्रेष्ठ आहे, असे प्रभू रामचंद्रांनी म्हटले होते.

कौसल्या, जिजाऊ, सरस्वतीबाई फडके, भुवनेश्वरीदेवी, पुतळीबाई या मातांनी अनुक्रमे प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजीमहाराज, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी असे सुपुत्र आपल्या सुसंस्कारातून निर्माण केले!” गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता पोफळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.