Pune Crime : भारती विद्यापीठ, लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटना

अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास

एमपीसी न्यूज : शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरु असणाऱ्या चोरीच्या घटना थांबण्याचे काही लक्षण दिसत नाहीत. शहरात दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहे. भारती विद्यापीठ आणि लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून यामध्ये चोरट्यांनी तब्बल अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. 

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव खुर्द मध्ये रवी देवजी चव्हाण यांच्या घरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. रवी चव्हाण घराला लॉक लावून हैदराबाद येथे गेले असता अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण दोन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मंतरवाडी येथे सोमनाथ बबन यादव यांच्या घरात चोरी झाली. सोमनाथ यादव हे घराला कुलूप लावून आईकडे राहण्यासाठी गेले असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत एक टीव्ही आणि रोख 25 हजार असा 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.