Pimpri News : हा भाई बनायला बघतोय, याची भाईगिरी काढून त्याला संपवून टाकू

तरुणावर खुनी हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक

एमपीसी न्यूज – ‘हा भाई बनायला बघतोय, याची भाईगिरी काढून त्याला संपवून टाकू’ असे म्हणत चार जणांनी मिळून एका तरुणाला कोयत्याने मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. 11) दुपारी दोन वाजता भाटनगर, पिंपरी येथे घडली.

पवन शाम मेवाते (वय 18, रा. निराधार नगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अजय रामा पवार उर्फ मद्री (वय 26), बाळा राजू कोळे (वय 25), आदित्य जाधव उर्फ लाला (वय 25), दीपक बनसोडे (वय 30, सर्व रा. पत्राशेड लिंकरोड, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी हे निराधार नगर येथून पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांचा मित्र सिद्धार्थ व्यंकटेश म्हेत्रे याची आरोपींसोबत बाचाबाची सुरू होती. त्यातील एकाने फिर्यादी यांना शिवीगाळ करत ‘इथे काय करतो’ अशी विचारणा केली.

फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांचा दुसरा मित्र अल्ताफ शेख याने फिर्यादी यांना आरोपींच्या तावडीतून सोडवून तिथून पळून जाण्यास सांगितले. फिर्यादी पळून जात असताना भाटनगर येथे आले असता आरोपींनी त्यांना धक्का देत खाली पाडले.

‘तुला माज आला आहे का, तू भाई बनतोस का, आज तुझा मर्डरच करतो’ असे म्हणत आरोपींनी कोयत्याने मारले. यात फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ‘हा भाई बनायला बघतोय, याची भाईगिरी काढून त्याला संपवून टाकू’ असे म्हणत पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.