Pune News : पुन्हा एकदा पुणे पोलिसांची मान शरमेने खाली, तीन पोलिसांनी लुटले 45 लाख, वाचा काय घडलं? 

एमपीसी न्यूज : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे नवनवीन कारनामे दररोज उघडे पडत आहेत. राष्ट्रपती पोलीस पदक मिळवण्यासाठी एका पोलिसाने गुन्हेगारी कृत्य केल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वीच उघडकीस आला होता. त्यानंतर पुणे पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुणे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांनी ठाणे शहरात जाऊन एका व्यक्तीकडून हवाला मधील 45 लाख रुपये लुबाडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तीनही कर्मचाऱ्यांवर  भिवंडीतिल नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी गणेश बाळासाहेब शिंदे (वय 35), गणेश मारूती कांबळे (वय 34) आणि दिलीप मारोती पिलाने (वय 32) अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलीसांची नावे आहेत. हे सर्व दत्तवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. तर, ठाणे पोलीसांनी बाबुभाई राजराम सोलंकी (वय 47) याला अटक केली आहे. याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा सर्व प्रकार 8 मार्च रोजी झाला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी गणवेशात जाऊन पैसे घेऊन जाणाऱ्या औरंगाबादमधील व्यापाऱ्याला आडवून कारवाईची भिती दाखवत 45 लाख रुपये जबरदस्तीने लुबाडले. यातील तक्रारदार हे औरंगाबादमधील आहेत. औरंगाबादमधून ते नाशिकमार्गे स्वत:च्या कारने ठाण्याकडे जात होते.

त्यांच्या कारमध्ये 45 लाखांची रोकड होती. दरम्यान, ही माहिती सोलंकी याला होती. त्याने हा प्रकार पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितला. यानंतर त्यांनी सकाळी-सकाळीच पोलीस गणवेशात तक्रारदारांचा माग काढत भिवंडी गाठले.

त्यानंतर आरोपींनी नाशिक मुंबई महामार्गावरील एका पेट्रोल पंपासमोर तक्रारदार व्यक्तीला गाठलं. त्याची कार अडवली आणि तुम्हाला पोलीस ठाण्यात यावे लागेल असे सांगत त्यांच्याकडील 45 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. त्यानंतर तक्रारदाराने नारपोली पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. दरम्यान, हा पैसा हवालामधील असल्याचे सांगितले जाते. सध्या हे तिघेही फरार आहेत. नारपोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.