PCMC Election 2022: निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग, उद्या राष्ट्रवादीचा तर रविवारी भाजपचा मेळावा!

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची एससी, एसटी, सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत निघाल्यानंतर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. कोण, कोठून लढू शकेल याचे चित्र स्पष्ट झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला. त्यापार्श्वभूमीर राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उद्या (शुक्रवारी) शहर दौ-यावर येत आहेत. महापालिकेच्या विविध कामांच्या उद्घाटनांसह पक्षाचा मेळावाही घेणार आहेत. त्यानंतर रविवारी (दि.5) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा होणार आहे. त्यामुळे राजकीय फिव्हर येण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही पक्षांचे मेळावे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातच होणार आहेत. दोनही पक्ष निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने थांबविलेल्या निवडणूक प्रक्रियेला गती दिली. ओबीसीविना आरक्षण सोडतही काढली. त्याची संपूर्ण प्रक्रिया 13 जूनला पूर्ण होणार आहे. न्यायालयाने ज्या भागात कमी पाऊस असतो. तिथे निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. आरक्षण सोडतीनंतर कोण, कोठून लढेल. पॅनेलमध्ये कोण-कोण राहील याचे आडाखे बांधले जात आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यास सुरुवात झाली. आरक्षण सोडतीनंतर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

भाजपने 2017 च्या निवडणुकीत महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता उलटवून लावली. महापालिकेवर भाजपचे कमळ फडकाविले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक भाजपमध्ये गेले होते. परंतु, पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भाजपमध्ये घुसमट झाल्याने काही नगरसेवकांनी राजीनामे देऊन पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. काहीजण प्रवेशासाठी वेटिंगवर आहेत. राज्यातील सत्तेतही राष्ट्रवादी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महापालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. भाजपकडून महापालिका खेचून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उद्या  पिंपरी – चिंचवड शहर दौऱ्यावर येणार आहेत. महापालिकेने केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहेत. दुपारी  चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पक्षाचा मेळावा होणार आहे.  या मेळाव्यात पक्षाच्या कार्यकारणीची घोषणा आणि पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी पवार शहरातील राजकीय वातावरण ढवळून काढतील आणि महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकतील अशी चर्चा आहे.

दुसरीकडे यावेळी महापालिकेची निवडणूक सोपी नसल्याची जाणीव भाजपलाही झाली आहे.  आगामी निवडणूक ही पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होणार असल्याचे खुद्द प्रदेशाध्यांनीच सांगितले. त्यामुळे महापालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजपनेही जोरदार तयारी सुरु केली. यावेळी 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यादृष्टीने रविवारी दुपारी तीन वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण प्रेक्षागृहात भाजपचा मेळावा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्राच्या विविध योजनांची माहिती जनतेला दिली जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. भाजपही निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात म्हणाले, ”केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपचा मेळावा होणार आहे. नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकीत 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा भाजपचा निर्धार आहे”.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ”भाजपने पाच वर्षांच्या राजवटीत नागरिकांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. यामधील काही प्रकरणाची चौकशीही सुरू झाली आहे. येत्या काळात आणखी काही प्रकरणाच्या चौकशा लागणार आहेत.  आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील आणि आमचाच महापौर होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.