Bhosari Crime News : मोबाईल चोरीवरून वाद; फावड्याने मारहाण, ओठांना चावा घेतल्याने चौघे जखमी

एमपीसी न्यूज – तरुणाचा मोबाईल फोन चोरीला गेल्याने त्याबाबत घर मालकाला सांगून संशयित दोघांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी करत त्यांच्या खोलीची झडती घेत असताना वाद झाला. यामध्ये दोन्ही बाजूच्या दोन-दोन तरुणांनी फावड्याने मारहाण करून एकमेकांना जखमी केले. एका तरुणाने ओठांचा चावा घेऊन जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी तुषार फुगे चाळ, दिघी रोड भोसरी येथे घडली.

अरुणकुमार हरिनाथ यादव (वय 26, रा. तुषार फुगे चाळ, दिघी रोड, भोसरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल मिश्रा (वय 26), रोहित मिश्रा (वय 27) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याने फिर्यादी यांना गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मालकाने बोलावले आहे, म्हणून बोलावून नेले. मालकाजवळ गेल्यावर बुधवारी रात्री राहुल मिश्रा आणि त्याचा भाऊ रोहित मिश्रा हे राहत असलेल्या खोलीतून मोबाईल फोन चोरीला गेल्याचे फिर्यादी यांना समजले. मोबाईल चोरीबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. त्यानंतर खोली मालक राहुल फुगे याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून बांबूने मारहाण केली आणि हाकलून दिले.

दरम्यान, खोलीवर आल्यानंतर आरोपी फिर्यादी यांच्या खोलीत येऊन मोबाईल शोधू लागले. त्याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपींनी फावड्याने मारहाण केली. हे भांडण फिर्यादी यांचा भाऊ अजयकुमार याने सोडवले असता आरोपींनी त्याला देखील फावड्याने मारून डोक्यात, पोटाला आणि पायांवर मारून जखमी केले.

याच्या परस्पर विरोधात राहुल शामजी मिश्रा (वय 26, रा. राहुल फुगे यांची चाळ, दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी अजय यादव, अरुणकुमार यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मोबाईल फोन घरात मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी घरमालकाला याबाबत सांगितले. आरोपींनी मोबाईल फोन घेतल्याच्या संशयावरून फिर्यादी आणि त्यांचा भाऊ आरोपींच्या खोलीत जाऊन मोबाईल शोधू लागले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. अरुणकुमार याने फिर्यादीच्या ओठाला जोराने चावा घेऊन गंभीर जखमी केले. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यात व पाठीत दगड मारले. अजय यादव याने फिर्यादी यांच्या भावाच्या हाताला चावा घेऊन तसेच डोक्यात, पाठीवर, हातावर, पायावर मारून गंभीर जखमी केले.

या भांडणात चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.