Lonavla News : भुशी डॅम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी रेल्वे विभागाने ‘एनओसी’ द्यावी 

 खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज  – मावळ लोकसभा मतदार संघातील लोणावळा येथील पर्यटकांचे आकर्षक असलेले भुशी डॅम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी रेल्वे विभागाने सहकार्य करावे.  त्यासाठीची ना-हरकत (एनओसी) रेल्वे विभागाने तत्काळ द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदार संघातील लोणावळा येथे भारतीय रेल्वे विभागाचा भुशी डॅम आहे. 1860 मध्ये पाण्याच्या स्रोतासाठी डॅमची निर्मिती केली होती. पावसाळ्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक भुशी डॅम वर येतात. पुणे आणि मुंबईचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी डॅम काठोकाठ भरण्याची वाट पाहत असतात.

डॅम ओव्हरफ्लो झाल्यानंतर या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये धरणाच्या पायर्‍यांवर बसून पावसात चिंब भिजण्याचा आनंद, तसेच फोटोची क्रेझ देखील पाहायला मिळते.  ओव्हरफ्लो झाल्यानंतर डॅम आकर्षक केंद्र बनते. हे सौंदर्य बघण्यासारखे असते. डॅम ओव्हरफ्लो झाल्यानंतर वाहणारे पाणी पाहण्यासाठी लाखो पर्यटक येतात.

2014 मध्ये भारतीय रेल्वेने भुशी धरण खासगी क्षेत्राच्या सहभागाने पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर केली. परंतु, आजपर्यंत त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे पर्यटन स्थळ केंद्र सरकार मार्फत विकसित होत नसेल. तर या पर्यटन स्थळावर  पर्यटकांना सुविधा देण्यासाठी रेल्वे विभागातर्फे एनओसी दिली जावी.रेल्वे विभागाने एनओसी दिल्यास महाराष्ट्र सरकारचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या माध्यमातून भुशी डॅम पर्यटनासाठी विकसित केले जाईल.  त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी भुशी डॅम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.