Pune News : 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी RTI कार्यकर्ता गजाआड

एमपीसी न्यूज : पोलिसांविरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडे पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. सुधीर रामचंद्र अल्हाट असे अटक करण्यात आलेल्या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आल्हाट सह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप आणि विवेक कोंडे या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 48 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीवर 2018 ते 2020 या काळात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याबाबत फिर्यादी यांनी अल्हाट याच्याकडे संपर्क केला होता. त्यावेळी आल्हाट याने डेक्कन पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सोनवणे याच्याविरुद्ध तक्रार अर्ज करा. तुम्हाला त्रास दिल्याचे आठ दिवसात पैसे काढून देतो असे सांगितले होते. माझी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे सांगून त्याने फिर्यादीना सोनवणे विरुद्ध लेटरहेडवर अर्ज करण्यास भाग पाडले होते.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला घरी बोलावून सोनवणे प्रकरणात पन्नास लाखाच्या खंडणीची मागणी केली. मला पैसे दिले तरच तुम्ही सोनवणे व पालवे यांच्यावरुद्ध केलेले अर्ज मागे घेऊन देईन असे सांगितले आणि पैसे नाही दिले तर ठार मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून आल्हाट याला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.