Chakan News : सराईत मोटरसायकल चोरटा जेरबंद, चोरीच्या पाच मोटरसायकली हस्तगत

एमपीसी न्यूज : चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरांना पकडण्यात येथील पोलीस व गुन्हे शोध पथकाला यश आले असून, सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातून मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी रेकॉर्डवरील अहमदनगरच्या सराईत गुन्हेगारास पाच मोटरसायकलीसह ताब्यात घेवून जेरबंद केले.

अशोक मधुकर सोनवणे ( वय – ४१, रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर ) असे अटक करण्यात आलेल्या मोटारसायकल चोराचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, चाकण पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक सोनवणे याची माहिती काढत असताना रविवारी ( दि. १८ जुलै ) मोटरसायकल चोर अशोक सोनवणे हा नाणेकरवाडी हद्दीत चोरीची मोटरसायकल विक्रीच्या उद्देशाने येणार आहे.

ही माहिती पोलिसांना मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने नाणेकरवाडी हद्दीत सापळा रचला. त्यावेळी सोनवणे याला पकडून त्याच्या जवळ असलेल्या हिरो स्प्लेंडर प्रो मोटरसायकल ( नं. एम. एच. १४, ईटी. ८८७१ ) बाबत चौकशी केली असता त्याने सदरची मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली दिली.  अधिक तपास केला असता त्याने चोरी केलेल्या आणखी चार मोटरसायकली आणून दिल्या. त्याच्या कडून एकूण पाच दुचाकी वाहनांसह सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अशोक सोनवणे हा मोटरसायकल चोरीमध्ये सराईत असून, त्याच्यावर यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये अनेक गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलिस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त परिमंडळ श्रीमंत किपर, उपायुक्त प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अनिल देवडे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम गायकवाड, विजय जगदाळे, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, मनोज साबळे, अनिल गोरड, नितीन गुंजाळ, निखिल वरपे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, विलास कांदे, सुप्रिया गायकवाड आदींनी केली. संदीप सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.