Maval News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रभान खळदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करून देखील पक्ष नेतृत्वाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे खळदे यांनी सांगितले.

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विशेष उपस्थितीत व मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करण्यात आला.

खळदे त्यावेळी म्हणाले की, मी गेली वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम करत आहे. माझ्या पत्नी हेमलता खळदेही नगरसेविका म्हणून काम करीत आहेत. गेली 25 ते 30 वर्षे काँग्रेस पक्षाचे मोठ्या निष्ठेने काम करत होतो, आमचा खळदे परिवार आज पर्यंत काँग्रेस विचाराशी बांधील होता. असे असतानाही या सर्व कालखंडात काँग्रेसच्या पंजा चिन्हावर शिक्का मारून मतदान करता आले नाही ही मोठी क्लेशदायक, दुःखदायक गोष्ट आहे.

विधानसभा, लोकसभेला सुद्धा मावळसाठी काँग्रेसला जागा सोडली गेली नाही, अनेक वेळा जिल्हाच्या, राज्याच्या नेतृत्वाकडे मागणी करूनही कधीच दखल घेतली नाही. नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्थानिक समितींच्या माध्यमातून निवडणुक बॅट, सायकल अशा  विविध चिन्हावर लढवावी लागली. विधानसभेला राष्ट्रवादीसाठी जागा असल्याने आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेसचा असून सुद्धा घड्याळालाच मतदान करावे लागले.

नुकत्याच झालेल्या पीएमआरडीएच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाने तळेगाव दाभाडे शहरामधील काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाकडे लक्ष दिले नाही. आणि कार्यकर्त्यांना विचारात घेतले नाही. मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू आहे. विविध कामांसाठी निधी दिला जात असून नागरिकांची कामे होत आहेत. या वातावरणाने प्रभावित होऊन हा निर्णय घेतला आहे. तसेच प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करणे योग्य नसल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचेही खळदे म्हणाले.

चंद्रभान खळदे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी नगरपरिषदेच्या विविध समित्यांवर सभापती म्हणून देखील काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.