Talegaon Dabhade : आजोबा रुग्णसेवा करत असलेल्या हॉस्पिटलला नातवांनी केली पाच लाखांची मदत

एमपीसी न्यूज – सुमारे 50 वर्षांपूर्वी आजोबा ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा करत होते, त्या हॉस्पिटलला दोन नातवांनी आणि त्यांच्या आईने तब्बल पाच लाखांची मदत केली. पुढील काही दिवसात आणखी पाच लाखांची मदत तर करणार आहेत असेही नातवांनी घोषित केले. हा सुखद प्रसंग तळेगाव मधील जनरल हॉस्पिटलमध्ये घडला.
मेजर जनरल अभिजित आणि कॅप्टन अनिरुद्ध बापट आणि त्यांच्या आई सुलोचना माधव बापट यांनी ही मदत केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुमारे 50 वर्षांपूर्वी कै डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांच्या खांद्याला खांदा लावून डॉ. भास्कर यशवंत परांजपे मुंबईहून दर शनिवारी, रविवारी  येऊन सातत्याने तळेगाव जनरल हॉस्पिटलला नेत्ररुग्णसेवा देत होते. काही महिन्यांपूर्वी डॉ. परांजपे यांचा तळेगावातील हा वैद्यकीय सेवेचा प्रवास त्यांच्या सुकन्या सुलोचना माधव बापट यांनी अत्यंत महत्प्रयासाने शोधून काढला. वडिलांच्या वैद्यकीय सेवेची माहिती सुलोचना बापट यांनी त्यांचे दोन्ही पुत्र मेजर जनरल अभिजित आणि कॅप्टन अनिरुद्ध बापट यांना सांगितला.

आपल्या परिवाराच्या अंतकरणात असलेले कृतज्ञतेचे भाव व्यक्त करण्यासाठी काही आर्थिक मदत तळेगाव जनरल हॉस्पिटलला करता येईल का, असा विचार सुलोचना बापट यांनी रुग्णालय प्रशासनाकडे मांडला. तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या नर्सिंगस्कूलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीच्या दृष्टीने त्यांनी 5 लाख रुपयांचा धनादेश चेअरमन शैलेश शहा आणि उपाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हाती सुपूर्द केला.
तसेच एप्रिल महिन्यात आणखी पाच लाखाची भर त्यात घालण्यात येईल असेही जाहीर केले. भविष्यकाळात अशाच प्रकारची मदत सातत्याने बापट कुटुंबियांकडून होत राहील असे आश्वासनही बापट बंधूंनी दिले.
तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या कार्यकारिणी सभेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खजिनदार विनायक अभ्यंकर, चंद्रभान खळदे, डॉ. किरण देशमुख, संजय साने, डॉ. शाळीग्राम भंडारी आदी उपस्थित होते. तळेगाव जनरल हॉस्पिटलचे व्यवस्थापक अधिकारी डॉ. अजय ढाकेफळकर यांनी या सर्व प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. हॉस्पिटलच्या वतीने बापट कुटुंबियांचे आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.