Pune News : लग्न सोहळ्यात फोटोचा मोह चांगलाच महागात, नवरीच्या भावाचे पाच लाख चोरले

एमपीसी न्यूज : लग्न सोहळ्यात वधूवरांसोबत फोटो काढण्यासाठी गेलेल्या वधूच्या भावाची तब्बल साडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. कोरेगांव पार्क येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 44 वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धानोरी परिसरात राहण्यास आहेत. ते आयटी इंजिनिअर आहेत. त्यांच्या बहिणीचे 3 मे रोजी कोरेगांव पार्क येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये येथे विवाह होता. सकाळी विवाह सोहळा पार पडला आणि त्यानंतर रात्री विवाहाचे रिस्पेशन होते. तक्रारदारांनी केटरिंग व इतरांचे पैसे देण्यासाठी 5 लाख 50 हजारांची रोकड जमा केली होती. ती त्यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या बॅगेत ठेवली होती.

दरम्यान, रात्री साडे 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनाही नवरी व नवरदेवासोबत फोटो काढण्यासाठी बोलावले. त्यामुळे त्यांनी बॅग फोटो काढत असताना पाठिमागील सोफ्यावर ठेवली आणि फोटो काढले. फोटो काढून त्यांनी बॅग पाहिली असता त्यांना बॅग नसल्याचे लक्षात आले. बॅगची शोधाशोध केली. पण, त्यांना साडे पाच लाखांची रोकड, एटीएम कार्ड व इतर वस्तू असणारी बॅग मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.