India Corona Update : 24 तासांत 1.53 लाख नवे कोरोना रुग्ण, गेल्या 50 दिवसांतील निच्चांकी रुग्णवाढ 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असून, गेल्या 24 तासांत मागील 50 दिवसांतील निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली आहे. चोवीस तासांत देशभरात 1 लाख 52 हजार 734 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 20 लाखांच्या घरात आली आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 80 लाख 47 हजार 534 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 56 लाख 92 हजार 342 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 2 लाख 38 हजार 022 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत निरंतर घट होत असून, देशात सध्याच्या घडीला 20 लाख 26 हजार 092 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 91.60 टक्के एवढा झाला आहे. मागील 24 तासांत देशभरात 3 हजार 128 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. आजवर 3 लाख 29 हजार 100 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.16 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 34 कोटी 48 लाख 66 हजार 883 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 16 लाख 83 हजार 135 चाचण्या रविवारी (दि.30) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत  देशात 21 कोटी 31 लाख 54 हजार 129 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.