Pimpri: सत्ताधारी भाजपच्या दोन नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग

Pimpri-chinchwad: Two BJP corporators infected with corona महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कोरोना योद्धा डॉक्टर, नर्सलाही लागण झाली आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे आणि शैलेश मोरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, आजपर्यंत आमदार महेश लांडगे यांच्यासह चार नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी (दि.4) निधन झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 4336 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. नगरसेवकांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. निगडी-यमुनानगरचे भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांना शुक्रवारी (दि. 3) कोरोनाची लागण झाली आहे.

आनंदनगर, भाटनगरचे भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचे रिपोर्ट आज (रविवारी) पॉझिटिव्ह आले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

महापालिका कर्मचा-यांनाही कोरोनाचा विळखा!

कोरोना विरोधात लढणा-या कर्मचा-यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कोरोना योद्धा डॉक्टर, नर्सलाही लागण झाली आहे.

भोसरी, आकुर्डी रुग्णालयातील वॉर्डबॉय, आया, मावशी यांनाही बाधा झाली आहे. पालिका मुख्यालयात कार्यरत असलेल्या उपअभियंता, क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, कर संकलन कार्यालयातील कर्मचारी, आरोग्य विभागातील साफसफाई कर्मचा-यांनाही बाधा झाली आहे.

जवळपास 30 कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना विरोधात लढणा-या कर्मचा-यांना लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.