Pimpri News: शहरातील निर्जनस्थळे, दुर्लक्षित जागांचे सर्वेक्षण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – अलिकडच्या काळात समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून व्यसनाधीन मुलांचा, युवकांचा गुन्हेगारीतला सहभाग लक्षणीय आहे. अशा गुंडांचे अड्डे बनायला शहरातील निर्जन स्थळे, अंधार्‍या, असुरक्षित, अस्वच्छ दुर्लक्षित देखभालीचा अभाव असलेल्या जागा कारणीभूत ठरत आहेत.  अशा जागांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना  देण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील निर्जन व दुर्लक्षित जागांचे सर्व्हेक्षण करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात खैरनार यांनी म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रातील ज्या निर्जन, दुर्लक्षित, सुरक्षा, देखभालीचा अभाव असलेल्या जागा अस्वच्छतेचा, टवाळखोरांचा अड्डा झाला असेल, उपद्रवकारक ठिकाणं झाली असतील, त्याबाबत कारवाई करण्याचे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची प्रकरण-14 मधील कलम 9 व 10 मध्ये या अधिकारांबाबत आणि आयुक्तांनी करावयाच्या कारवाईबाबत स्पष्ट तरतूदी आहेत.

महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुकादम /अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे मुकादम तसेच सफाई मुकादम किंवा आपणास योग्य वाटेल अशा यंत्रणांमार्फत शहरातील निर्जन व दुर्लक्षित जागांची सर्वेक्षणाद्वारे यादी तयार करावी. अधिनियमात तरतूद असल्याप्रमाणे तातडीने कारवाईचे पाऊल उचलावे. जेणेकरून शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने ते पूरक ठरू शकेल, असे खैरनार यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.