23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Chakan News : एटीएम स्फोटासाठी डीटोनेटर जिलेटीनचा वापर,२८ लाखांची रोकड लंपास

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : चाकण एमआयडीसी मधील भांबोली ( ता. खेड . जि. पुणे ) हद्दीतील मुख्यरस्त्याच्या लगत असलेले एटीएम मशीन अज्ञातांनी स्फोट करून फोडले. या एटीएम मधील सुमारे २८ लाखांची रक्कम लंपास झाल्याची माहिती महाळुंगे पोलिसांनी दिली आहे.  सदरची घटना बुधवारी ( दि. २१) पहाटेच्या वेळी घडली आहे. सदरचा स्फोट डीटोनेटर जिलेटीनच्या साह्याने दोघांनी घडवून घडून आणला आहे ; मात्र त्यात आणखी कोणती स्फोटके वापरण्यात आली याचा तपास सुरु आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी कि, भांबोली ( ता. खेड ) गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्याच्या लगत हिताची कंपनीचे एटीएम आहे. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास येथे आलेल्या अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मधील पैसे काढण्यासाठी चोरट्यांनी स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटामध्ये मध्ये एटीएम मशीनचे मोठे नुकसान झाले. स्फोट घडवून चोरट्यांनी मशीन मधील रोकड लंपास केली.

घटनेची माहिती मिळताच महाळुंगे पोलीस चौकीचे पथक, गुन्हे शाखेचे पथक व  श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. हिताची कंपनीच्या एटीएममधून सुमारे २८ लाख रुपये काढण्यात चोरटे यशस्वी झाले. तर मशीनच्या फुटलेल्या भागात १० ते ११ लाख रुपये सुरक्षित राहिले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.  एटीएम मशिनजवळ करण्यात आलेल्या स्फोटाची पोलीस चौकशी सुरू आहे.

डीटोनेटर जिलेटीनच्या साह्याने बॅटरी व वायर लावून सदरचा स्फोट घडवून आणला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र यात गंधक किंवा अन्य कोणती स्फोटके वापरुन स्फोट करण्यात आला याचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी परिसरात किती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत यांचा आढावा घेऊन त्या सर्व कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फूटेजमधून चोरट्यांविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मशिन ज्या ठिकाणी आहे त्या परिसरात चौकशी सुरू आहे.  संबंधित एटीएमवर सुरक्षारक्षक नेमलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. महाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हिताची कंपनी सहआरोपी :
सदर एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक, आलार्म आदी सुरक्षा व्यवस्था नेमण्याच्या सूचना महाळुंगे पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे हिताची कंपनीने आणि संबंधित ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केले. त्यामुळे हिताची कंपनी व ठेकेदार कंपनीला चोरट्यांना सहकार्य केल्याच्या संशयातून सहआरोपी करण्यात आले असल्याचे महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले.

असामाजिक संघटनांचा सहभाग ?
एटीएम मशिनचे लॉक तोडणे किंवा मशिनचा पत्रा कापून आतील पैसे चोरणे कठीण असते. यामुळेच चोरट्यांनी एटीएम मशिन मध्येच स्फोट करुन मशिन उघडण्याचा प्रकार केला आहे.  चोरट्यांनी मशिनचा पत्रा वाकवण्यासाठी या एटीएम मशिनजवळ स्फोट केला. स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि एटीएमचे भरपूर नुकसान झाले. स्फोट केल्यानंतर चोरट्यांनी एटीएममधील पैसे चोरुन पळ काढला. असे स्फोट कोण घडवू शकतात ?  याचा तपास सुरु आहे.

एटीएम रडारवर :
चाकण औद्योगिक परीरातील विविध बँकांच्या एटीएम वर चोरट्यांची नजर असल्याची स्थिती गेल्या काही काळात समोर आली आहे. येथील एका घटनेत चक्क सुरक्षा रक्षकाचा खून करून एटीएम फोडण्यात आले होते. काही एटीएम मशीन चक्क जीपला दोरी बांधून उपसून नेण्यात आली होती. मात्र स्फोट घडवल्याची धक्कादायक घटना प्रथमच समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे सदरच्या घटने बाबत घातपाताचा संशय देखील वर्तविला जात असल्याने पोलिसांच्या तपासाची सूत्रे अशा काही संघटनांच्या दिशेने फिरू लागल्याची माहिती पोलीस वर्तुळातून समोर येत आहे.

 

 

spot_img
Latest news
Related news