Pimpri News : खासगी परवानाधारक प्लंबर्सना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पाणीपुरवठाविषयक तसेच जलनिस्सारणविषयक कामे करणाऱ्या खासगी परवानाधारक प्लंबर्स यांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात आता वाढ करण्यात आली आहे. यापुढे नवीन प्लंबर परवाना देण्यासाठी तीन वर्षांकरिता पाच हजार रुपये शुल्क आणि नूतनीकरण करण्यासाठी प्रतिवर्षी एक हजार रुपये याप्रमाणे दरवाढ करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात विकसक, बांधकाम व्यावसायिक तसेच खासगी मालमत्ताधारक यांची पाणीपुरवठाविषयक तसेच जलनिस्सारणविषयक कामे परवानाधारक प्लंबर्स यांच्यामार्फत करण्यात येतात. त्याकरिता खासगी प्लंबर्सना महापालिकेमार्फत परवाना देण्यात येतो. त्यासाठी परवानाधारकांना महापालिका आयुक्त यांच्या 31 डिसेंबर 2001 च्या मंजूर टिपण्णीनुसार, परवाना शुल्क पाच वर्षाकरिता 1 हजार 500  रुपये आकारण्यात येते.

हे परवाना शुल्क 2001 या आर्थिक वर्षांपासून प्रचलित आहे. तथापि, आता 20 वर्षांहून अधिक काळ होऊनही या शुल्कामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. ही बाब लक्षात घेत नवीन प्लंबर परवाना देण्यासाठी तीन वर्षांकरिता पाच हजार रुपये शुल्क आणि नूतनीकरण करण्यासाठी प्रतिवर्षी एक हजार रुपयेप्रमाणे दरवाढ केली जाणार आहे.

नवीन परवाना घेण्यासाठी तीन वर्षांकरिता पाच हजार रुपये इतके शुल्क घेऊन परवाना देण्यात येईल. नूतनीकरणासाठी प्रतिवर्षी एक हजार याप्रमाणे तीन वर्षांसाठी तीन हजार रुपये आकारण्यात येतील. परवानाधारकाने परवान्याची मुदत संपण्यापूर्वी दोन महिने अगोदर नूतनीकरणासाठी अर्ज सादर करावा. मुदत संपल्यानंतर तीन महिन्यांत नूतनीकरण केले नाही, तर परवाना रद्द होईल.

अर्ज करणारी व्यक्ती ही आयटीआय प्लंबर, बी. ई. सिव्हिल, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग, एएमआई, एमआयई किंवा बी. आर्किटेक्ट असावी. तसेच अनुभवी खासगी प्लंबरकरिता प्लंबिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. परवाना प्लंबर्सना शहरातील बांधकाम व्यावसायिक तसेच खासगी मालमत्ताधारकांचे प्रभागनिहाय नळ, ड्रेनेज कनेक्शन व देखभाल, दुरुस्तीची कामे करणे गरजेचे राहील. तसेच कामाचा वार्षिक अहवाल सादर करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.