Pune News : मागील वर्षीचे बजेट 8370 कोटींचे, यंदाचे किती? पालिका आयुक्त आज सादर करणार बजेट

एमपीसी न्यूज : पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार आज स्थायी समिती समोर 2022-23 या वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते अंदाजपत्रक सादर करतील. पुणे महानगरपालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपणार आहे. परंतु महापालिकेच्या निवडणुका लाभल्याने महापालिका आयुक्तांना 2022-23 या वर्षाचे अंदाजपत्रक मांडण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान भाजपची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेने गेल्या वर्षभरात अनेक मोठमोठ्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यामुळे ती कामे पूर्ण करण्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात मोठी तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकात नवीन प्रकल्प असतील की अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल हे या अंदाजपत्रकात स्पष्ट होणार आहे.

दरम्यान येत्या 14 मार्च रोजी पुणे महानगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेले अंदाजपत्रक सात दिवसात स्थायी समितीच्या अध्यक्षांना मांडता येणार नाही, त्यात तांत्रिक अडचणी येतील. त्यामुळे आगामी वर्षभरात आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होईल असे चित्र प्रथमदर्शनी दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.