Chakan News : वीजबिल थकल्याने कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचा-यांना पाय तोडण्याची धमकी

एमपीसी न्यूज – वीजग्राहकाचे वीजबिल थकले असल्याने संबंधित ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी महावितरणचे कर्मचारी गेले. त्यावेळी एका व्यक्तीने महावितरणच्या कर्मचा-याला मारहाण करत पाय तोडण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना बुधवारी (दि. 5) दुपारी मेदनकरवाडी येथे घडली.

सागर विशाल मोहिते (रा. मेदनकरवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजेश शिवाजी पाटील (वय 22, रा. तापकीर चौक, काळेवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेदनकरवाडी येथील वीज ग्राहक पांडुरंग रामभाऊ मेदनकर यांचे वीजबिल थकले होते. त्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी फिर्यादी राजेश पाटील आणि त्यांचे सहकारी तळपे हे बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास गेले होते. पांडुरंग मेदनकर यांचे वीज कनेक्शन तोडत असताना आरोपी सागर मोहिते तिथे आला.

त्याने फिर्यादी यांचे सहकारी तळपे यांना ढकलून दिले. फिर्यादी यांचा शर्ट पकडून त्यांना कानशिलात मारली. ‘तू मीटर कसा काढतो तेच बघतो. इथून तुम्ही निघून जा नाहीतर तुमचे हातपाय काढून टाकीन’ अशी आरोपीने धमकी दिली. फिर्यादी हे करत असलेल्या शासकीय कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.