Hinjawadi News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – एक दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने त्याच्या आठ साथीदारांसोबत येऊन तरुणावर चाकूने वार केले. तसेच तरुणाच्या मित्राला मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 22) रात्री पावणे आठ वाजता बालेवाडी येथे घडली.

रोहन राजेंद्र पाटील (वय 21, रा. क्रीडाप्रबोधिनी, म्हाळुंगे, ता. मुळशी), हरीश शिंदगी अशी जखमींची नावे आहेत. रोहन पाटील यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अल्पवयीन मुलासोबत नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हिल बाळासाहेब जाधव (वय 18, रा. गुजरनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र हरीश मंगळवारी रात्री होस्टेलच्या गेटसमोर बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. अल्पवयीन मुलाचे फिर्यादी यांच्यासोबत सोमवारी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून मुलाने फिर्यादी यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर हरीश शिंदगी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात हरीश याचे दोन दात तोंडात घुसून गंभीर दुखापत झाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.