Sangvi News : कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला मागितली खंडणी

एमपीसी न्यूज – रस्त्याचे काम सुरु असेलल्या ठिकाणी जाऊन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला फोन करून खंडणी मागितली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली.

मोसिम बाबू सय्यद (वय 27, रा. दापोडी), डेव्हिड जगताप (वय 35, रा.सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोसिम याला अटक केली आहे. याप्रकरणी शुभम संजय चिपडेपाटील (वय 21, रा. पुणे, मूळ रा. यवतमाळ) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार,फिर्यादी हे अंबिका कन्स्ट्रक्शन या कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीने पिंपळे गुरव येथील त्रिमूर्ती चौकातील रस्त्याचे काम घेतले आहे. ते काम सुरु असून फिर्यादी रविवारी कामावर होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपी मोसिम आणि डेव्हिड दुचाकीवरून तिथे आले. आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या मालकाला फोन करण्यास सांगितले.

फिर्यादी यांनी मालकाला फोन केला. त्यावेळी आरोपींनी ‘या ठिकाणी काम करायचे असेल तर मला दिवसाला दोन हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर मी लोकांना बोलावून काम बंद पाडील’ अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या मालकाला फोनवर धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी फिर्यादी यांना एटीएमकडे ओढू लागले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलिसांनी मोसिम याला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.