Pune News : संशयित तरुणाच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या अश्लील क्लिपवरून गंभीर गुन्ह्याची उकल

एमपीसी न्यूज : गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तळजाई पठार परिसरातून संशयास्पदरीत्या ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ क्लिप सापडली. त्यानंतर यावरून एका गंभीर गुन्ह्याची उकल झाली. तिघांनी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. सहकारनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली. 

ईश्वर शिंदे (वय 20), कुणाल भांगरे (वय 19) आणि निलेश नेटके (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हा गुन्हा घडल्याने हवेली पोलिस स्टेशनकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर शिंदे हा तळजाई पठार परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद अवस्थेत सापडला होता. त्याच्या मोबाईलमध्ये दोन व्यक्ती एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार करत असल्याची क्लिप आढळून आली होती. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत ही क्लिप त्यानेच रेकॉर्ड केल्याचे सांगितले.

सहकारनगर पोलिसांनी पीडित मुलाचा शोध घेतला. त्यानंतर या मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन्ही तरुणांचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

आरोपींनी यावर्षी दिवाळीच्या कालावधीत या अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. हवेली पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडल्याने आरोपी आणि हा गुन्हा हवेली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.