Pimpri News : जिजामाता रुग्णालय येथे ट्रॉमा सेंटर सुरू करा – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटर तयार करण्याची मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, पिंपरी- चिंचवड शहरातून मोशी ते दापोडी ( नाशिक महामार्ग), दापोडी ते निगडी ( पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग ) तसेच वाकड ते किवळे ( बंगळुरू – मुंबई महामार्ग ) असे मुख्य महामार्ग जातात तसेच शहरांतर्गत अनेक अंतर्गत रस्ते आहेत की ज्यांच्यावर रोज किरकोळ व  मोठ्या स्वरुपातील अपघात होत असतात.

तसेच मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर देखील अपघात होत असतात अश्या वेळी नागरिकांना तत्काळ उपचार मिळणे गरजेचे असते. महापालिकेच्या वतीने वाय.सी.एम.रुग्णालयामध्ये अश्या अपघात ग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातात परंतु वाय.सी.एम. रुग्णालयावर इतरही रुग्णांचा ताण असल्याने अनेक रुग्णांवर वेळीच उपचार मिळण्यासाठी अनेकदा विलंब होतो त्यामुळे तातडीची मदत मिळणे शक्य होत नाही.

या पार्श्वभूमीवर ट्रॉमा सेंटरचा पर्याय रूग्णाला संजीवनी देऊ शकतो. ही बाब शहरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मध्ये जिजामाता रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. रुग्णालयामध्ये नवीन ऑपरेशन थिएटर बनविण्याचे काम सुरू आहे.

याच बरोबर 24 X 7 सी.एम.ओ, न्यूरोसर्जन ,ओर्थोपेडिक सर्जन,जनरल सर्जरी,जनरल मेडिसीन,ई.एन.टी. सर्जन, एम.आर.आय. –  3 टेस्ला,  सी.टी.स्कॅन 64 SLICES, डिजिटल एक्स रे ( डी.आर.सिस्टिम ),सी – आर्म ( हाय फ्रिक्वेंसी ) अल्ट्रा सोनोग्राफी, व एम.एल.सी. साठी एक पोलिस चौकी  या बाबींचा समावेश केला तर एक अद्ययावत ट्रोमा सेंटर करणे सहज शक्य होणार आहे. पिंपरीतील  जिजामाता रुग्णालय येथे ट्रॉमा सेंटर सुरू करण्याचे निर्देश संबधित विभागास देण्याची मागणीही वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.