Chakan News : चाकणमध्ये तीन अपघातात तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. 12) तीन अपघात झाले. दोन अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटल्याने त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. तर तिस-या अपघातात ट्रकच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

नारायण सीताराम कांबळे (वय 45, रा. कडाचीवाडी, ता. खेड) असे ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ सतीश सीताराम कांबळे (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक गोविंद गंगाधर चाटे (वय 27, रा. चाकण) याला पोलिसांनी अटक केली आहे. मयत नारायण हे रविवारी दुपारी साडेबारा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर सुर्या हॉस्पिटल समोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रकने नारायण यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताच्या दुसऱ्या घटनेत आशिष मारुती मचेकर (वय 22, रा. देहूगाव) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आशिष याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवून तिच्यावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात आशिष गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले. या अपघातात आशिषचा मृत्यू झाला. ही घटना चाकण गावच्या हद्दीत रोहकल ते वाकी रोडवर घडली.

अपघाताच्या तिस-या घटनेत प्रतीक महाबल शिरढोणे (वय 23, रा. देहूगाव. मूळ रा. रिधोरे, ता. माढा. जि. सोलापूर) याचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री  प्रतीक त्याच्या दुचाकीवरून येलवाडी वरून देहूगावकडे जात होता. येलवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात त्याची दुचाकी आदळली. यात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर पडला. यात गंभीर जखमी झाल्याने प्रतीकचा मृत्यू झाला. वरील तिन्ही अपघातांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.