Pune News : महत्वाच्या पदांवरील व्यक्तींकडून न शोभणारी वक्तव्य केली जात आहेत – अजित पवार

एमपीसी न्यूज – महत्वाच्या पदांवरील व्यक्तींकडून महाराष्ट्राच्या बाबतीत न शोभणारी वक्तव्य केली जात आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना नाव न घेता लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) भरगच्च कार्यक्रम झाले. एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर, महापौर माई ढोरे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, जपान, फ्रांस देशाचे राजदूत आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महत्वाच्या पदांवरील व्यक्तींकडून महाराष्ट्राच्या बाबतीत न शोभणारी वक्तव्य केली जात आहेत. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांचे विचार पुढे न्यायचे आहेत, असा टोला नाव न घेता राज्यपालांना लगावला.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “पंतप्रधानांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील महत्वाच्या कामांचे उदघाटन झाले आहे. ही कामे पुण्याच्या शैक्षणिक सांस्कृतिक वैभवात भर घालणारी आहेत. याबद्दल पालकमंत्री म्हणून मोदींचे आभार. छत्रपती शिवाजी महाराजांची, जिजाऊंची ही भूमी आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा वारसा आम्ही जपत आहोत.

पुणेकरांच्या सहनशीलतेचा सलाम केला पाहिजे. जून 2010 मध्ये पुणे मेट्रोचा ठराव संमत झाला. त्यानंतर मेट्रो अंडरग्राउंड करायची की एलिव्हेटेड करायची यात काही दिवस गेले. त्यानंतर नितीन गडकरी यांनी काहीशी कठोर भूमिका घेत मेट्रोची सुरुवात केली. सन 2014 मध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्राची पहिली मेट्रो सुरु झाली. नागपूर मध्ये दुसरी मेट्रो धावली. आता पुणे मेट्रो सुरु झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पीसीएमसी ते निगडी, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, स्वारगेट ते कात्रज, अन्य मार्गांच्या मेट्रोसाठी मदत करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

मुळा मुठा नदी सुशोभीकरण, शुद्धीकरण करताना पाण्याचे स्रोत, जैवविविधता आणि अन्य बाबींची खबरदारी आम्ही घेऊ. यापुढे शासनाकडून केली जाणारी वाहन खरेदी ही इलेक्ट्रिक असेल. इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कशी कमी करता येईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.