Wakad News : चेहरा झाकून चारमजली इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – चेहरा झाकून एका तरुणीने चार मजली इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली. सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित तरुणीने हे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी सात वाजताच्या सुमारास माऊली चौक, वाकड परिसरात घडली.

नम्रता गोकुळ वसईकर (वय 24, रा. नंदनवन कॅालनी, माऊली चौक, वाकड, मूळ रा. दराणे रोहले, ता. शिंदखेडा, जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता हि सोमवारी सकाळी घरातून बाहेर पडली. माऊली चौकातील एका चार मजली इमारतीमध्ये ती नजर चुकवून गेली. त्यानंतर इमारतीच्या छतावरून खाली उडी मारली. दरम्यान तिने तिचा पूर्ण चेहरा स्कार्फने झाकला होता. खाली पडल्याने नम्रता गंभीर जखमी झाली. यात तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या घटनेची माहिती एका स्थानिक व्यक्तीने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षातून वाकड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला नम्रताची ओळख पटली नाही. तिला तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

नम्रता बराच वेळ घरी आली नाही, म्हणून घरच्यांनी तिचा परिसरात शोध घेतला. त्यानंतर घरच्यांनी पोलीस ठाणे गाठले. तिथे नम्रताचा फोटो दाखवला असता पोलिसांनी नम्रताच्या मृत्यूबाबत तिच्या घरच्यांना माहिती दिली. शवविच्छेदन केल्यानंतर नम्रताचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

नम्रता ही उच्च शिक्षित आहे. तिचे बिटेक पर्यंत शिक्षण झाले आहे. नम्रताचे कुटुंब मूळ धुळे जिल्ह्यातील आहे. तिला लहान भाऊ असून त्याला पुण्यात नोकरी लागली असल्याने नम्रता आणि तिचे आई, वडील, भाऊ सर्वजण सहा महिन्यांपूर्वी वाकड परिसरात राहण्यास आले. तिचे वडील चर्मकार म्हणून व्यवसाय करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.