India Corona Update : देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 213, दिल्ली व महाराष्ट्रात सर्वाधिक 

एमपीसी न्यूज – भारतात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सध्या देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 213 झाली असून, त्यापैकी दिल्लीत 57 तर, महाराष्ट्रात 54 रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 213 पैकी 90 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 6 हजार 317 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 47 लाख 58 हजार 481 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 42 लाख 01 हजार 966 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 6 हजार 906 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या उतरणीला लागली आहे. सध्याच्या घडीला देशात 78 हजार 190 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल 575 दिवसांनंतर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाली आली आहे. यामुळे देशाचा रिकव्हरी रेट देखील वाढून 98.40 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 318 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 78 हजार 325 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.38 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 66 कोटी 73 लाख 56 हजार 171 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत 12 लाख 29 हजार 512 नमूने तपासण्यात आले आहेत. ‘आयसीएमआर’ने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

लसीकरणात देश आघाडीवर असून आजवर 138 कोटी 95 लाख 90 हजार 670 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 57 लाख 05 हजार 039 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.