Pimpri News : लसीकरणात तरुणाई आघाडीवर, ज्येष्ठांची पिछाडी

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लस टोचवून घेण्यात पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणाई आघाडीवर आहे. तर, ज्येष्ठ नागरिक पिछाडीवर असल्याचे आकडेवारी सांगते. 18 ते 44 या वयोगटातील 104 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला. तर, 60 वर्षापुढील केवळ 63 टक्के ज्येष्ठांनी पहिला डोस घेतला आहे.

महापालिकेतर्फे 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण शहरात सुरू आहे. तेव्हापासून आतापर्यंत 18 ते 44 या वयोगटातील 11 लाख 25 हजार 433 जणांनी पहिला तर 7 लाख 44 हजार 07 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दोनही डोस घेण्या-यांचे प्रमाण 68 टक्के आहे. 45 ते 59 या वयोगटातील 2 लाख 89 हजार 715 व्यक्तींनी पहिला तर 2 लाख 30 हजार 924 जणांनी दुसराही डोस घेतला आहे. त्याचे प्रमाण 58 टक्के आहे. तर, 60 वर्षांवरील 1 लाख 77 हजार 888 जणांनी पहिला आणि 1 लाख 56 हजार 226 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचे प्रमाण 56 टक्के आहे. शहरातील 15 लाख 93 हजार 36 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 33 हजार 73 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. शहरातील एकूण 27 लाख 96 हजार 409 जणांनी लस घेतली.

60 वर्षांपुढील नागरिकांचे लस घेण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या घरी जाऊन किंवा घराजवळ केंद्र उभारून लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. कोरोना संसर्ग काही वय पाहून होत नाही. तो कोणालाही होऊ शकतो. परंतु, त्यविरुद्ध लढण्यासाठी, त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा त्याचा त्रास कमी होण्यासाठी तरुणांसह ज्येष्ठांनीही प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे. सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.