Pimpri News: चार दिवसानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी बबन झिंझुर्डे यांची निवड घोषित

एमपीसी न्यूज – चार दिवसांनंतर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांची निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी मंगळवारी (दि.1) सायंकाळी  वाजता घोषित केले. या घोषणेनंतर कर्मचा-यांनी महापालिकेच्या बाहेर घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला. 

पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी शुक्रवारी (दि. 25 फेब्रुवारी) निवडणूक झाली होती.  एकूण 5 हजार 505 कर्मचार्‍यांनी मतदान केले. त्यानंतर मतमोजणीस सुरूवात झाली. मोजणी शनिवारी (दि.26) रात्री साडेअकराला संपली. अध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले शंकर अण्णा गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे आणि आपला महासंघ पॅनलचे अंबर चिंचवडे या दोघांमध्ये केवळ 9 मतांचे अंतर आहे.

आकडेवारीत 294 मतांची बेरीज लागत नाही. तसेच, इतर उमेदवारांच्या मतांमध्येही घोळ आहेत, अशी तक्रार करीत अंबर चिंचवडे यांनी फेरमोजणीची मागणी शनिवारी (दि.26) केली होती. मोजणी पूर्ण होईपर्यंत कोणतेही निकाल जाहीर न करण्याची मागणी केली होती.

यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करुन निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी निकाल घोषित करताना सांगितले की, स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांना एकूण 2534  मते मिळाली तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना 2525 मते मिळाली आहेत. सर्व पंचविस जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांना गुरुवारी 3 मार्च रोजी निवडणूक कार्यालयात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 10 पैकी 9 पदाधिकारी निवडून आले. तर कार्यकारणी सदस्य पदासाठी एकूण पंधरा जागांपैकी दहा उमेदवार निवडून आले. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 25 पैकी 19 उमेदवार निवडून आले.

विजयी उमेदवार :-  बबन झिंझुर्डे  (अध्यक्ष) मनोज माछरे, महादेव बोत्रे (दोघे उपाध्यक्ष), अभिमान भोसले (सरचिटणीस), मंगेश कलापुरे (चिटणीस), उमेश बांदल (सहसचिव), नितीन समगीर (कोषापाल), दिगंबर चिंचवडे (मुख्य संघटक), शुभांगी चव्हाण (संघटक), लाला गाडे, तुषार कस्पटे, संजय कापसे, सुरज टिंगरे, चंद्रशेखर गावडे, धर्मेद्र शिंदे, नंदकुमार इंदलकर, अण्णासाहेब वाघोले, दत्तात्रय ढगे, विशाल बाणेकर (सर्व सदस्य) हे सर्व उमेदवार शंकर गावडे पॅनलचे आहेत. तर, सुप्रिया सुरगुडे (उपाध्यक्ष), कार्यकारणी सदस्य रूपाली कड, गोरख भालेकर, विक्रम लांडगे, नीलेश घुले, विकास काळजे हे विजयी उमेदवार आपला महासंघ पॅनलचे आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.